* बाजीराव : दिव्य प्रेमाला काय झेपण अशक्य आहे?
बल्लाळ : ते ठीक आहे. पण दिव्यतेचे हे रंग उडाले म्हणजे खाली उतरतात केवळ विटक्या रंगाच्या क्षुद्र बाबी।
***********************************************************
* बल्लाळ : डोंट यु वरी ! अग बच्चुच काही सुशीलशी लग्न होत नाही !
प्रियंवदा : तुम्हाला त्याचं अंतरज्ञान झालंय वाटतं ?
बल्लाळ : अगं अंतरज्ञान कशाला ? मानसशास्त्राचा प्रोफेसर आहे मी ! प्रेमाच्या बाजारपेठेतले पक्क्या रंगाचे नग कोणते आणि पहिल्याच धुलाईत विटनाऱ्या रंगाचे सनंग कोणते ते ओळखता का येत नाही मला ?
***********************************************************
* बब्बड : म्हणजे इतकं सहन करून मी आपली वाईट ! चूक काय ती माझीच !
बल्लाळ : हे बघ बेटी, अशी डोक्यात राख घालू नकोस ! चूक तुझी नाही, आणि त्याची नाही ! अगं, सप्तपदी चालून संसाराच्या भट्टीत उतरल्यावर पतीपत्नीच्या प्रेमाचे सगळे गहिरे रंग असेच ओघळतात बरं पोरी ! मग खाली उतरतात फक्त ओबडधोबड माणसं ! अगं, 'रोमिओ-ज्युलीयेट' आणि 'लैला-मजनू' यांनी बिऱ्हाड करून संसार थाटला असता, तर त्यांना देखील आपला च्योईस चुकला असाच साक्षात्कार झाला असता !
***********************************************************
बल्लाळ : हे बघ बेटी, अशी डोक्यात राख घालू नकोस ! चूक तुझी नाही, आणि त्याची नाही ! अगं, सप्तपदी चालून संसाराच्या भट्टीत उतरल्यावर पतीपत्नीच्या प्रेमाचे सगळे गहिरे रंग असेच ओघळतात बरं पोरी ! मग खाली उतरतात फक्त ओबडधोबड माणसं ! अगं, 'रोमिओ-ज्युलीयेट' आणि 'लैला-मजनू' यांनी बिऱ्हाड करून संसार थाटला असता, तर त्यांना देखील आपला च्योईस चुकला असाच साक्षात्कार झाला असता !
***********************************************************
* बाजीराव : तुम्हाला तरी प्रेमाचा काय अनुभव आहे हो अण्णा ? आयुष्यात तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं आहे काय?
निळूभाऊ : पोरा, तू... तू... तू असे विचारतोस ?
बाजीराव : विचारतो म्हणजे ? भीती आहे काय ? एकदा सोडून दहा वेळा विचारीन. जो स्वत: प्रेम करतो त्यालाच प्रेमाबद्दल दुसऱ्याला जाब विचारायचा अधिकार पोचतो, समजलात ! बोला तुम्ही कधी दिव्य प्रेम प्रेमाचा अनुभव घेतला आहे ?
निळूभाऊ : खर आहे पोरा, तुमच्या दिव्य प्रेमाचा अनुभव नाही आम्हाला, आमचे आयुष्य गेलेय फक्त कष्ट उपसण्यात। आमची उमेद खर्च झाली पावलोपावली मन मारण्यात. संसारात फार फार सोसावे लागते ते सोसलेय आम्ही ! तू तू पोर - तूच विचारलेस म्हणून बोलतो. नाही तर माया करणारा माणूस ओठांनी बोलत नाही ; तो आपल्या दोन भक्कम हातांनी बोलतो. तुझी आई तुझ्या जन्मापासून अशी पांगळी होऊन अंथरुणाला खिळलेली. तिला टाकून दुसरा संसार थाटण्याचा सल्ला दिला होता मला, तुझ्या आजोबाआजींनी - प्रत्यक्ष तिच्या जन्मदात्या आईबापांनी। पण आम्ही तो कधीच जुमानला नाही. अरे, पांगळ्या बायकोची शुश्रुषा करण्यात उभी हयात आम्ही का घालवली ? वखारीत व्यापार आणि घरात घरकाम हि दुहेरी कसरत जन्मभर आम्ही कशासाठी केली ? पोरा, अरे तू बारा दिवसांचा लोळागोळा होतास तेव्हापासून तुला आईच्या मायेने अंगाखांद्यावर कोणी वाढवला ? अरे, संसार म्हणजे काय पत्त्यांचा पोरखेळ समजलास, कि मनासारखी पाने हातात आली नाहीत तर दिला डाव उधळून ? अरे, हातात येतील ती फतरी पाने घेऊन हा डाव जिद्दीने खेळला पाहिजे ! बेटा, त्याला देखील अंगात हिम्मत असावी लागते !
***********************************************************
***********************************************************
सुशील : गैरसमज झालाय तुमचा ! अहो, आमच्या संसाराला मुळी दिव्य प्रीतीचा पायाच नव्हता, तर -
बल्लाळ : सांगितलं कोणी तुला संसाराला दिव्य प्रीतीचा पाया असतो म्हणून ? खरं सांगू ? संसाराला पाया असतो फक्त मदनबाधेचा, क्वचित मैत्रीचा आणि फार फार तर स्वभावातल्या सामानधर्माचा !
सुशील : मदनबाधा ? दिव्य प्रीतीची विटंबना करताहात हि तुम्ही !
बल्लाळ : विटंबना ! छे छे, वस्तुस्थिती सांगतोय मी तुला। अगं, 'दिव्य प्रीती, दिव्य प्रीती' असा जयघोष करीत तुझ्यासारखे पतंग ज्या ज्योतीवर झेप घेतात, ती दिव्यही नसते आणि प्रीतीही नसते. फुलपाखरांना चित्रविचित्र पंख देणारा जादुगाराच स्त्री-पुरुषांना त्यांच्या वसंतकाळी आकर्षणाचे गडद रंग देत असतो, समजलीस ? मोठा लबाड आहे हा दुनियेचा सम्राट ! एका हातानं तो रंग देत भरतो, आणि प्रेमिकांच्या पदरांना गाठ मारता मारता दुसऱ्या हातानं तेच रंग तो हलकेच पुसून टाकतो. श्रावणातल्या संध्याकाळी रंगाच्या साजशृंगात मेघमाला कशा दिमाखानं मिरवीत असतात नाही ? पण सूर्य मावळला कि हा सगळा दिमाख ओघळतो आणि त्याच मेघमाला एका क्षणात किती ओक्याबोक्या - किती कळाहीन दिसायला लागतात ! वेडे पोरी, मला सांग, तुमच्या दिव्य प्रीतीची गत यापेक्षा काही निराळी आहे का ?
सुशील : तसं असेल तर स्त्री-पुरुषांच्या उदात्त प्रेमाला काही अर्थच उरला नाही म्हणायचा !
बल्लाळ : अर्थ का नाही ? अगं, मदनबाधेचे रंग पुसले गेले म्हणून बिघडलं कुठ ? फळ धारण करण्यापूर्वी फुल गळून पडावं हा निसर्गाचा नियमच आहे मुळी ! बेटी, उदात्त प्रेम म्हणजे संसाराच्या पोटात खोलवर दडलेला एक गुप्त धनाचा संचय आहे, समजलीस ? पण हे धन केवळ वयात आल्याबरोबर वारसाहक्क सांगून नाही कोणाला हस्तगत होत बरं का ? कुणासाठी तरी शरीर आणि मन अहोरात्र झिजवाव, तेव्हा हा गुप्त संचय दिसायला लागतो। हातात हात घालून जन्मभर दु:खवैफल्याची वाटचाल करावी तेव्हा प्रेमिकांना हा ठेवा प्राप्त होतो. सुशील, पोरी, मला सांग अशी कोणासाठी झिजली आहे तू ? कोणासाठी हातात हात घालून दु:खवैफल्याची वाट तू चालली आहे ? बोल - कोणाच्या दु:खात आपली दु:ख, कोणाच्या आनंदात आपला आनंद पहिला आहेस तू ?
***********************************************************
No comments:
Post a Comment