आज वसंत कानेटकर यांनी लिहिलेले "अश्रूंची झाली फुले" हे नाटक वाचले.
आजच्या समाजव्यवस्थेत वाममार्गाने अफाट द्रव्यप्राप्ती करणारा वर्ग, या
द्रव्यप्राप्तीच्या अनुषंगाने येणारी धुंदी आणि सामर्थ्य व त्यामुळे होणारा
मानवी मूल्यांचा चुराडा, बुद्धिजीवी वर्गाची ससेहोलपट, त्यांच्या व्यथा हा
सारा भाग या संघर्षाचे नवे स्वरूप होय. पैशाबरोबरच भ्रष्टाचारही या धनिक
लोकांनी शिक्षणक्षेत्रात आणला आणि या भ्रष्टाचारात सामील न होणार्या
विद्यानंदसारख्या प्राध्यापकाची मुळे जमिनीतून उखडून टाकण्याच्या प्रयत्नात
ही माणसे गुंतली. हा सर्वच संघर्ष मांडताना वसंत कानेटकर ढोबळ
कृत्रिमतेबरोबर एकसूक्ष्म सत्य सूचित करून जातात.
मुळामध्ये या
नाटकाचा पाया जारी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत असला आणि या
भ्रष्टाचारात सामील न होणारे यांची होणारी फरफट दाखवली असली तरी हा
भ्रष्टाचार आणि त्याच्या विरोधकांची होणारी फरफट सर्वच क्षेत्रांना तंतोतंत
लागू पडते आणि याला पोलिस खाते सुद्धा अपवाद नाही.
या नाटकातील काही माझ्या मनाला भावलेले संवाद देत आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील...
*
शंभूमहादेव : छान! चांगलं! म्हणजे हिला वळण लावण्यासाठी मी तुमच्या घरी
होतो, तर तुम्ही मलाच ताळ्यावर आणण्यासाठी हिला नेमलीत? आता ही कसली माझ्या
धाकात राहणार?
सुमित्रा : शंभूमहादेव, लग्न झालेल्या बाईला
कोणी दुसर्यांनी नाही वळण लावाव लागत. संसाराचा पाशच तिला वळणात ठेवतो.
धाकट ठेवावं लागत तुमच्यासारख्या पुरूषांना.
* विद्यानंद : पेढी गमावली? म्हणजे व्यसनात गमावली?
लाल्या
: (दुखावून) छे, भलतच काय बोलताय सर! माझे वडील तसले नाहीत. माझे आईवडील
तशी अगदी देवमाणस आहेत. पण जगात कस वागव ते त्यांना कळलच नाही. अगदी मूर्ख
आहेत ते.
विद्यानंद : काय रे बाबा, काय केलं त्यांनी?
लाल्या :
जन्मभर सर्वांशी सचोटीन आणि विश्वासान वागले. पण काय फळ मिळालं शेवटी?
भाऊबंदांनी लुबाडल आणि भागीदारांनी बुडविल. आता त्याच पेढीवर कारकुनी
करताहेत. आमचा मामा म्हणतो तेच खर. ही दुनिया काही भल्याची नाही. इथ खरे
भिकेला लागतात नि खोटे चैनीत जगतात.
* लाल्या : (गोरामोरा होत) सुरा उगरण्यात माझी चूक झाली सर...
विद्यानंद
: त्याहीपेक्षा फार प्रचंड चूक तू अद्याप करतो आहेस. सैतानला मनाच्या
देव्हार्यात बसविल आहेस आणि स्वताच्या विवेकबुद्धीचा तू जाणूनबुजून खून
चालविला आहेस. एवढच नव्हे तर त्याबद्दल भूषण वाटतय तुला.
* लाल्या : (मान खाली घालून) ठीक आहे, त्यांचीही माफी मागेन मी तुमच्यासाठी!
विद्यानंद : माझ्यासाठी नाही. स्वतासाठी (लाल्या गप्प राहतो. तशी-) लाल्या, चूक स्वताची असली तरी दुर्जनांचीदेखील क्षमा मागायला मनाच औदार्य लागत.
* लाल्या : (गोरामोरा होत) फार जबर शिक्षा करणार?
विद्यानंद
: तो माझा प्रश्न आहे. पण शिस्तीच्या दृष्टीन तुझ्या अपराधाबद्दल तुला
शिक्षा होण जरूर आहे, ते तर तुला पटत? (लाल्या पुन्हा खाली मान घालतो.
तशी-) लाल्या, प्रायश्चिताशिवाय चुकीच परिमार्जन होत नाही. आणि शिक्षा भोगायलाही धैर्य लागत.
तुला काय शिक्षा करयाची ती मी विचार करून थरविण. पण होईल ती शिक्षा तू
निमूटपण, कोणालाही दोष न देता आणि कसलीही सूडबुद्धी मनात न ठेवता भोगली
पाहिजेस.
* सुमित्रा : मला तर मनान भाबडा, सरळ दिसला हा मुलगा.
विद्यानंद : खर आहे. पण सुमा, त्यान माझी तिरपीट उडवून टाकली. बघतेस काय, अग हे जग भल्याच नाही, इथ खरे भिकेला लागतात नि खोटे चैनीत जगतात, - अशा ठार झालेल्या विवेकबुद्धीन हा पोरगा मला आपले अनुभव सांगायला लागला तर -
* शाम : अरे, शेटजी म्हणजे काही अशी तशी आसामी समजू नकोस... वरपर्यन्त त्यांच्या ओळखी आहेत. त्यांची मर्जी राखलीस तर-
लाल्या : ते धंदे मेहेरबान तुम्ही करा, मला शिवावू नका.
शाम
: तू हाडाचाच उर्मट आहेस. तुला पटायचा नाही माझा हिताचा सल्ला. पण ऐकून
ठेव, आपण नोकरपेशातल्या माणसांनी सगळ्यांशी कस मिळून मिसळून गोडीन वागाव.
अरे, गोड बोलायला पैसे तर पडत नाहीत?
लाल्या : शामराव, सरांच्या घरच अन्न खाऊन हेच का हो सत्त्व मिळवलत?
शाम : (उसळून) लाल्या- (लाल्या हसतो. तशी-) ठीक आहे. माझ अन्न काढून हसतोस? हास, हास, खुशाल हास. उपासमारीची धग लागल्याशिवाय नाही वितळणार तुझी मिजास!
लाल्या : (एकदम गंभीर होत) चुकताहात महाशय. उपासमारीच्या धगीतच तर मी लहानाचा मोठा झालोय. पण उपासमारीनदेखील लाचार नाही केल मला कधी.
शाम : कळेल कळेल वेळ येईल तेव्हा -
लाल्या : शामराव, कळेल- तेव्हा देखील मी मोडेन पण वाकणार नाही कोणापुढ.
* विद्यानंद : Death, be not proud, though some have called thee mighty and dreadful, for thou art not so!
* लाल्या : (भारावून) तुम्हाला मी कधी तरी विसरण शक्य आहे का सर?
विद्यानंद : मला विसरलास तरी चालेल. पण मला अभिमान वाटेल असा मोठ्ठा हो; थोर मनाचा आणि ताठ मानेचा हो.
लाल्या : सर, तुम्हाला माझ्यापायी फार फार त्रास-
विद्यानंद
: हां हां हां, लाल्या, हे शब्द काढले की सोन्यासारख्या भावनेची माती
होते. आत्ताच सुमित्रेने मला ही प्राजक्ताची फुल दिली आणि ती म्हणाली, की
सगळ्याच भावना शब्दांनी सांगायच्या नसतात. लाल्या, सुमित्रेन दिलेल्या
फुलातला हा थोडासा प्रसाद घे आणि या फुलासारखा हो! सत्विक, सुंदर, नि प्राजक्तासारखा सुगंधी!
*
शंभूमहादेव : एक फार चांगली गोष्ट झालीय विद्यानंद. म्हणजे वकील म्हणाले
हो अस. गुन्हा काबुल करायच्या पूर्वीतुझ्या तोंडून एक इंग्रजी वाक्य
उच्चारल गेल ना, कोठल्याश्या नाटकातल? कोणत हो वहिनी?
सुमित्रा : एट टू ब्रूटस? देन फाल सीझर!
विद्यानंद : (खळखळून डोळ्यातून पानी येत स्वताशीच) एट टू ब्रूटस? देन फाल सीझर! एट ब्रूटस दाऊ टू? देन आय मस्ट डाय.
* सुमित्रा : (धावत जाऊन त्याचा हात धरित) एक शाम कृतघ्न निघाला म्हणजे जगातलं सगळं सत्वच मातीमोल झालं का- विद्यानंद?
विद्यानंद : (पिसाटपणे तिचा हात हिसडून ओरडतो) शट अप. गलगला करू नका. इथ सिझर मारून पडला आहे. त्याच्या प्रिय शिष्यांनी आणि सहकार्यांनी मिळून त्याच्या पाठीत खंजीर खुपसले आहेत.
* सुमित्रा : तुम्हाला त्या माणसात राहायचं नसेल तर-
विद्यानंद : वेडी आहेस सुमित्रा. त्रिखंडात
मला कुठही घेऊन गेलीस तरी माणस तीच, पाणी तेच, सूर्य तोच! माती तीच, बीज
तेच, वृक्ष तोच! या मातीतच कीड माजली आहे! या पाण्यातच विषार पोसला आहे! या
सूर्याच्या मस्तकावरच साक्षात मृत्युन आपला सर्वनाशाचा मुकुट रोवला आहे.
जा, परत जा. मुटभर माती भाजून धरतीची कीड मारत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून
महासागर शुद्धं होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मारणार आहेत
दुनियेतले सगळे विद्यानंद आणि या विषारी मातीत मस्त फोफावणार आहेत फक्त
धर्मपपा! जा! जा! माणसांनी घडविलेल्या दुनियेचाच हा न्याय कोणी बदलू शकत
नाही! जा! जा! आलीस तशी परत जा! विद्यानंदाला विसरून परत जा!
* विद्यानंद : सुमित्रा, सुमित्रा, - कोठल्याही सती सावित्रीन तुझ्यापुढ नतमस्तक व्हावं अशी सखी सहचरी प्रणयिनी पतिव्रता आहेस तू. सावित्रीन
यमाच्या पाशातून पातिव्रत्याच्या बळावर आपल्या पतीला सोडवून आणल. पण वेडे,
त्याच कारण यम निष्ठुर असला तरी माणसाइतका नीच नव्हता, माणसाइतका उलट्या
काळजाचा नव्हता. तुझ्या सारख्या शेकडो सतीसावित्रींच्या प्रेमाची वा
पुण्याईची धर्माप्पाच्या पाशापुढ काय मिजास? अग, न्यायदेवता आंधळी आहे
म्हणूनच धर्माप्पा सारखे शैतान तिला हातोहात फसवतात आणि बळी जातो निष्पाप
विद्यानंद. सुमित्रा, तू 'मी तुम्हाला सोडणार नाही' म्हणून कितीही टाहो फोडलास तरी मुदत संपली की या तुरुंगाचा पहारेकरी तुला घेऊन जाईल.
* विद्यानंद : (शंभूमहादेवाचा हात हाती घेत) मित्रा, सुटल्यानंतर मला तुझी फार गरज लागणार आहे.
शंभूमहादेव : (भरल्या डोळ्यांनी) मी तुझ्या इतका हुशार कधीच नव्हतो विद्यानंद पण-
विद्यानंद : नव्हे मित्रा, अरे
तूच माझ्यापेक्षा हुशार ठरलास. अरे, तुला जेवढ हे जग कळलं तितकं या मूर्ख
विद्यानंदाला कधीच समजलं नाही. मित्रा, आजवर विद्यानंदाच्या जागेवर बसून
आयुष्याचा डाव नेकीन मांडला. फासे उलटे पडले. आता सुटल्यावर धर्माप्पाच्या
जागेवर बसून दोन डाव पुन्हा टाकायचे म्हणतो.
* विद्यानंद
:सुमित्रा, खर बोलायची माझी सवय अजून पुरती सुटली नाही, म्हणून तुला
सांगतो. माझी सगळी धनदौलत मी कशी पैदा केली आहे हे तुला पाहायचं असेल तर
उद्या रात्री आठ वाजता एयरपोर्टवर ये. तिथ जे बघशील त्यान तुझी दृष्टीच
फिरेल आणि रक्तपित्यासारखा माझा तिरस्कार करून तू-
सुमित्रा : (रडत, किंचाळत) विद्यानंद, माझी शपथ आहे, अमंगल बोलू नका. (धावत जवळ जाऊन त्याचा हात धरित) जगांन तुम्हाला घायाळ केल असलं तरी मी तुमच्या सगळ्या जखमा बर्या करीन. चला विद्यानंद, आपल्या घरी चला. आपल्या
घरात कदाचित दुखच असतील, पण नरकातल्या क्षुद्र, केविलवाण्या सुखापेक्षा
त्या घरकुळातील दुखदेखील श्रेष्ठ नि सुंदर आहेत. चला विद्यानंद,
सुखदुखापेक्षाही या घटकेला तुम्हाला माझ्या प्रेमाची गरज आहे.
*
शंभूमहादेव : (दचकून, गांगरून मागे सरत, त्याला न्याहाळीत गोंधळून)
विद्यानंद, वाटल्यास पायातल काढून थोबाडीत हाण, पण कधी कधी तुझ खर काय नि
खोट काय तेच आम्हाला कळेनास होत.
विद्यानंद : (घायाळ होत) अरे, तुलाच का- मला देखील कळेनास होत.
शंभूमहादेव : विद्या-
विद्यानंद
: (उठत स्वताला हरवीत) अस वाटतं की हे हे सगळच नाटक चालवलय. यात खर काय नि
खोट काय म्हणून मला काय विचारतोस? माझा मी, जसा मला वाटतो, नि जसा तुला
दिसतो, तो तरी खरा आहे का? या कोनातून पाहा- तुला दिसेन मी पराक्रमी
पुण्यश्लोक नायक. पण त्या कोपर्यातून बघशील तर म्हणशील की हाच तो दुष्ट
खलनायक. पण जरा स्थितप्रज्ञ होऊन आणि नेमका समोरचा मध्ये गाठून पाहशील तर
तुला खात्रीच होईल की तुझ्यासमोर नाचतो आहे एक मजेदार रक्तबंबाळ विदूषक! खर
काय नि खोट काय? (हसतो.) अरे, खर्याची झळक पाहिली म्हणून आता जरा
खोट्याची मजा बघतोय मजा. पुण्यातली चव गेली तशा पाप कशाशी खातात ते शोधतो आहे. जगण्याचा सोहळा संपला. तेव्हा आपुले मरण मी याचि देही याचि डोळा न्याहाळतो आहे. (खळखळून हसतो) खर काय आणि खोटे काय? अरे, पाहा पाहा, राजरस्त्यावरून
आज संतसज्जनांची पाच पाट काढून धिंड निघालीय धिंड! अरे, माडीमाडीतून डोळे
मोडीत सती सावित्री पतिव्रता बसल्या आहेत पतिव्रता! अरे, ठग पेंढारी
हत्तीवरून साखर वाटतं चालले आहेत, साखर. आणि या पवित्र कार्यात त्यांना
विघ्न करणारे विघ्नकर्ते विद्यानंद तर चौकाचौकात फासावर लटकले जात आहेत
फासावर! आणि या मंगल घटीकेला वेड्या, तू विचारतो आहेस- खरे काय आणि
खोटे काय? (पिसाटपणे हसतो, हसता हसता डोळे पाणावून आवेगाने परत फिरत्या
खुर्चीवर येऊन कोसळत नि टेबलावर दोन्ही बाजूंना सताड हात पसरीत नि टेबलावर
डोके ठेऊन स्फुंदत स्फुंदत-) खरे एकच आहे शंभू. अरे, अजून पाश सुटत नाही-
अजून माया मरत नाही. अजून नाळ तुटत नाही रे शंभू...
* नीलम : मग तुम्ही तरी हा मासा पकडायला कोणत्या गळाची योजना केलीय?
विद्यानंद : गळ? ठरवलं नाही अजून. गाठ पडल्यावर बघू. इंग्लंडचा पंतप्रधान वॉल्पोल म्हणून होता एक पूर्वी. तो म्हणायचा, की एव्हरी मॅन हॅज हिज प्राइस.
* आरोळे : म्हणजे काय प्रश्न आहे भि.शा.? अरे, कार्लाइलनं चक्क म्हटलय, 'ए हीरो इज ए हीरो एट ऑल पॉईंट्स!'
विद्यानंद : तसच आमचा शेक्सपियर देखील म्हणतो, 'अ मॅन मे स्माइल अँड स्माइल अँड स्टिल बी अ व्हिलन!' का, बरोबर आहे न शाम- आय मीन शामराव? म्हणजे अभ्यास सुटलाय आता माझा, म्हणून विचारतो. (हसतो)
* लाल्या : (हसून) उत्तम. तुमचे आशीर्वाद पाठीशी असताना कोणाचे कधी वाईट होईल का सर?
विद्यानंद : (हसून) ए बाबा, आशीर्वाद फिशीर्वादात काही तथ्य नाही. सर्वे गुणा कांचनमाश्रयन्तु... मनी मेक्स मेअर गो... (हलकेच) पोलीसखात्यात वर्णी लागली ना तुझी? (लाल्या मानेनेच 'होय' म्हणतो, तशी-) गुड! पैसा मिळवतो आहेस ना रग्गड?
* लाल्या : (हसून) या माझ्या पोषाखावर जाऊ नका. मी सी.आय.डी. मध्ये आहे सर. या विमानतळावर नुकतीच बढतीची नेमणूक मिळालीय मला.
विद्यानंद : (त्याच्याकडे स्तंभित होऊन पाहत) गुड हेवन्स...
लाल्या : कशासाठी ठाऊक आहे सर? माझ रेकॉर्ड अगदी स्वच्छ आहे. लोक घाबरतात मला.
विद्यानंद : (गांगरून) लाल्या-
लाल्या : हा व्यवसायच असा आहे सर, की पावलोपावली
हज्जार प्रकारचे मोह तुडवावे लागतात. नुसती मान झुकविण तर एका रात्रीत मी
बिनबोभाट लक्षाधीशच काय पण कोट्यधीश होईन. पण नुसती मान ताठ ठेवायचा निश्चय
केला, की शेकडो पुंजीपतींच शत्रुत्व, सहकार्यांचा रोष, वरिष्ठांचा छळ,
आणि प्रसंगी वनवासदेखील पत्करावा लागतो. विद्यानंद : (गलबलून) लाल्या -
लाल्या : या सगळ्या दिव्यातून अवघ्या तीन वर्षात मी तावून सुलाखून पार पडलोय सर. ताठ मानेनं 'नाही' म्हणण्यातदेखील एक जिद्द आहे, नाही का?
विद्यानंद : (हादरत) म्हणजे लाल्या तू-
लाल्या
: नाही नाही. तस समजू नका सर. मोहाला बळी पडण्यासारखे प्रसंग
माझ्यावरदेखील येत नाहीत, अस मानू नका. पण वरिष्ठांचा माझ्यावर फार विश्वास
आहे. आणि... आणि...खर सांगू सर मोह पडावा आशा प्रत्येक वेळी मला
तुमची आठवण होते. तुम्ही या झुट दुनियेसाठी काय काय ब्रम्हांड सोसल आहे
त्याच स्मरण मला होत आणि माझ पाऊल माग फिरत.
* लाल्या :
तुमच्या खालोखाल सर, आणखी एकच माणूस आहे, जिने शेकडो वेळा पतनापासून
निग्रहान मला वाचवलय. (गहिवरून) सर...बाई...तुम्ही दोघांनी माझ्या घरी
यायला हव एकदा, आणि माझ्या बायकोला भेटायला हव. तिला फार फार फार आनंद
होईल. सर, तिला पाहिलं की मला दोनच व्यक्तींची आठवण होते. एक माझी आई आणि
दुसर्या या बाई. तुम्हाला म्हणून सांगतो, तिने माझ्यासारख्या एका बेछूट
वेड्या पिरावर अपार प्रेम केले... सरळ मार्गावर मला साथ दिली पण वाकड पाऊल पडायच्या प्रसंगी माझी कानउघडणीदेखील केली. म्हणून म्हणूनच मी.. मी...मी...(गहिवरतो)
सुमित्रा : (कष्टाने अश्रु आवरीत) लाल्या, तुझी बायको फार भाग्यवान आहे रे. फार थोर आहे.
लाल्या : पण बाई, ती नेहमी म्हणते की, 'तुमचे
सर फार फार थोर आहेत.' ज्यांनी रस्त्यावर धुळीत पायदळी पडलेल्या मला
फुलासारखे अल्लाद उचलले, मला दानत दिली, धैर्य दिले, मला माणसात आणल आणि
सर, त्या वेळी जे मला कळत नव्हते ते आज उमजतय. तुमच्या सगळ्या मोठेपणामागे
बाईचे थोर थोर सत्व उभे होते.
* लाल्या : पाण्यासारखा पैसा
सोडलाय त्याने मला विकत घेण्यासाठी - पण फार वाईट वाटत सर... पण माझा
नाईलाज होता. आय कुडन्ट हेल्प इट. बोला आता- तुमच्यासाठी मी काय करू?
विद्यानंद
: (उठून त्याचा हात धरून) शहाणा असशील तर पैसा घे- लाल्या, पैसा घे- पण
त्याच्या वाटेला जाऊ नकोस. फार भयंकर बदमाश आहे म्हणे तो- त्याच्याशी वैर
करू नकोस...
लाल्या - हे मला तुम्ही केवळ वेड्या मायेच्या पोटी सांगत आहात सर. करून करून काय करणार आहे तो मला? माझ्यावर मारेकरी घालील, माझा खून करील- त्याची तमा नाही मला.
विद्यानंद
- फाजील गर्व वाहू नकोस लाल्या... तो नुसताच बदमाश नाही... पक्का धूर्त
आहे, बुद्धिमान आहे. तुमच्या खात्यातल्या भल्या-भल्यांना लोळवलय त्याने.
लाल्या : (उसळून) सो व्हॉट? भ्रष्ट
झालेल्या धूर्त वरिष्ठांनादेखील असल्या बाबतीत मी आजवर बधलो नाही, ते काय
बुद्धिमान बदमाशापुढे जिवाच्या भयाने शरण जाण्यासाठी? (हसतो) तस काही एक होणार नाही सर. तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका. असले बदमाश वरुन अवसान आणतात तितकेच आतून भ्याड असतात भ्याड...
* विद्यानंद : दुंनियेची रीतच आहे तशी, त्याला तू काय करणार आणि मी तरी काय करणार? इथे खरे भिकेला लागतात आणि -
लाल्या : (भडकून सो व्हॉट? भिकेला
लागण्यापेक्षा भ्रष्ट होण तुम्ही का पत्करलत? आणि भ्रष्टच व्हायचं होते
तर, धुळीत पाडलेल्या मला त्या वेळी माणसात तरी का आणलत? सर, मी वाईट होतो,
तेव्हादेखील जिद्दीन इमान राखून वाईटांचीच साथ केली. धुळीच्या रस्त्यावरून
देखील ताठ मानेन मी धुळीतच जायला निघालो होतो. का म्हणून तुम्ही धुळीने
माखलेल्या या या माझ्या हातात, बाईंनी दिलेली प्राजक्ताची फुले ठेवलीत?
'त्या फुलासारखा सात्विक, सुंदर नि सुगंधी हो' - म्हणून माझ्या आईच्या
प्रेमळ हाताने का तुम्ही मला आशीर्वाद दिलात? आईच्या कुशीत चिमुकल बाळ ज्या
विश्वासान गाढ झोपी जाते, त्याच विश्वासाने सर, तुमच्या खांद्यावर मी मान
टाकली होती. (कष्टाने हुंदका आवरीत) तुमच्यावरल्या माझ्या
भाबड्या विश्वासाला असे नखच लावायचे होते, तर सर, कशाला माझ्या अंतकरणात एक
सुंदर मूर्ती कोरलीत आणि का असे घणाचे घाव घालून तिचे तुकडे तुकडे केलेत? का? का? का?
* लाल्या : (प्रक्षोभ आवरीत) सर, हात पुढे करा.
विद्यानंद : माझ्या दृष्टीला दृष्टी भिडवून पुन्हा सांग.
लाल्या : (विद्यानंदाकडे ताडकन वळून दृष्टीला दृष्टी देत... पण कातर आवाजात), सर, हात पुढे करा.
विद्यानंद
: (क्षणमात्र रोखून पाहतात. एक प्रसन्न स्मित त्यांच्या मुद्रेवर उजळते.
हलकेच हात पुढे करीत म्हणतात-) पाहू दे त्या विद्यानंदाच्या शिष्याची
हिंमत... (लाल्या त्यांच्या दोन्ही हातात हातकड्या अडकवतो आणि त्याच क्षणी
ब्रह्मांड आठवून त्यांचे दोन्ही हात धरून मटकन त्यांच्या पायाशी गुडघ्यावर
बसतो; घळाघळा रडू लागतो. तशी-)
विद्यानंद : (साश्रू नयनांनी पण अत्यानंदाने) शाबास लाल्या, शाबास! विद्यानंदाचा तू खरा पुत्र शोभतोस. विद्यानंदाने लावलेली रोपे या मातीत झडून गेली नाहीत, एक तरी वृक्ष मातीत रूजला, वाढला, आकाशाएवढा झाला.
लाल्या : (अश्रु वाहत असतानाच चकित होऊन वर पाहात) सर-
सुमित्रा : (भरल्या डोळ्यांनी विस्मयाने ताडकन उठत) विद्यानंद!
विद्यानंद
: माफ कर लाल्या. क्षमा कर सुमित्रा... सुटण्याचीच धडपड मला करायची असती
तर या पूर्वीच मी शिताफीने पसार झालो असतो. किंवा या एरोड्रोमवर आलोच नसतो.
पण लाल्या, मी तुझ सत्व पाहात होतो.
लाल्या : (रडत) बोलताहात काय तुम्ही सर?
विद्यानंद
: खर तेच बोलतो आहे लाल्या. अरे, पैशाला तू भुलणार नाहीस हे मला ठाऊक
होते. पण सुमित्रेच्या डोळ्यातले अश्रु पाहून तू विरघळतोस की नाही हे मला
पाहायचे होते. असं काय बघतोस वेड्या? अरे, पैशाला न भुलणारी माणसंदेखील अखेर मायेच्या माणसापुढ लडबडतात आणि भ्रष्ट होतात.
अरे, तुझ्या सत्वपरीक्षेचा क्षण हाच माझ्या पुनर्जन्माचा क्षण नव्हता का?
(लाल्या ढसढसा रडत मान खाली घालतो तशी हातकड्या घातलेल्या हातांनीच
त्याचे केस हिसडुन मान वर करीत, विद्यानंद-) नाही, नाही लाल्या. मान खाली घालू नकोस. तुझी मान ताठ राहिली पाहिजे. तुझी मान ताठ राहण्यासाठी माझी मान फासावर लटकली तरी पर्वा नाही.
लाल्या
: (रडता रडता आवेगाने वर पाहात) सर, सर, मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो,
की ज्यांनी तुम्हाला माणसातून उठविले त्यांचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार
नाही.
विद्यानंद : वेडा आहेस तू लाल्या! आता मला सूड नकोय. शिक्षा हवीय. अरे, ज्यांनी
मला माणसातून उठवले ते अखेर आपल्याच वृतीने आणि कर्माने मारणार आहेत.
विद्यानंदाच भांडण त्या क्षुद्र कीटकांशी कधीच नव्हते. माती आहे तिथे किडे
असायचेच, आणि माणस आहेत त्या समाजात धर्माप्पा फूत्कारायचेच. अरे,
बागवानच्या दक्षतेने मशागत केलेल्या मातीत मी लावल्या होत्या अमृताच्या
वेळी, आणि त्या मातीनेदिली माझ्या हातात हलाहलाची फळे. लाल्या, माझे भांडण
होते या मातीशी. पण त्याच मातीने अमृताच्या फळांनी लगडलेला वृक्षच
माझ्यापुढे आज उभा केला, आणि माझी श्रद्धा मला दिली. आता पळून जाऊन नव्हे
तर प्रायश्चित भोगूनच ही श्रद्धा मला जागविली पाहिजे, फुलवली पाहिजे.
लाल्या : (आवेगाने) पण सर, आता तुम्हाला किती किती भयंकर शिक्षा होईल!
विद्यानंद : त्याची पुरती कल्पना आहे मला लाल्या. पण आता मिळेले ती शिक्षादेखील मी धैर्याने, आनंदाने सोशीन. अरे, श्रद्धा
असेल तर माणूस फासावर देखील हसतमुखाने जातो, पण श्रद्धच नसली तर एक
दिवसाच्या साध्य कैदेत देखील तो नरकयातना भोगतो. वाईट वाटून काय घेतोस
वेड्या? अरे, मी जे केले, भोगले, सोसले त्यासाठी प्रायश्चिताच्या अग्नीत
मला जळून शुद्ध व्हायला नको का? लाल्या, त्या वेळी तू मला वचन दिलेस तसे मी आज तुला वचन देतो, की माझ्या अपराधाबद्दल मला मिळेल ती शिक्षा निमूटपणे, कोणालाही दोष न देता आणि कसलीही सूडबुद्धी न ठेवता अगदी आनंदाने भोगीन.